जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महसूल दिनाच्या औचित्याने जळगाव तालुक्यातील बेळी गावात घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गावातील २३ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण) अंतर्गत मंजूर घरकुलासाठी शासकीय जागेचे अधिकृत वाटप आदेश प्रदान करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या आदेशांचे वितरण करण्यात आले असून, यामुळे लाभार्थ्यांना आता आपल्या हक्काचे घर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे सर्व लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमित स्वरूपात वास्तव्यास होते. त्यांच्या कडे स्वतःच्या मालकीची जमीन उपलब्ध नसल्याने घरकुल उभारणीस अडथळा येत होता. शासनाच्या सामाजिक न्याय व समावेशी विकासाच्या धोरणांतर्गत अशा लाभार्थ्यांना शासकीय नियम व प्रक्रियेच्या अनुषंगाने अधिकृत जागा देण्यात आली आहे. हा निर्णय शासनाच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतिबिंब मानला जात आहे.

ग्रामविकास विभागाच्या १६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ‘शक्ती प्रदत्त समिती’च्या शिफारसीनुसार सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर अखेर या २३ लाभार्थ्यांना शासकीय जागेचे अधिकृत आदेश प्रदान करण्यात आले.
या निर्णयामुळे लाभार्थ्यांना ना केवळ अधिकृत घरकुलासाठी जमीन मिळाली, तर त्यांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण होण्यास मदत झाली आहे. घरकुल उभारण्यासाठीची ही प्रशासकीय मदत त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठीही आधार ठरणार आहे. हा उपक्रम शासनाच्या ‘घर सबके लिए’ या संकल्पनेला बळ देणारा आहे.
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, सरपंच तुषार दिगंबर चौधरी, उपसरपंच जयश्री तुषार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. लाभार्थ्यांनी शासनाचे आभार मानत हा निर्णय त्यांच्या जीवनात “नवा वसंत” घेऊन आला असल्याचे सांगितले.



