Home प्रशासन तहसील  बोदवडमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात 

 बोदवडमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात 


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महसूल विभागाच्या कार्यक्षमतेला दाद देत आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने महसूल दिन २०२५ चा प्रारंभ बोदवड तहसील कार्यालयात उत्साहात झाला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात महसूल विभागातील उल्लेखनीय सेवा करणाऱ्या ९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ई-केवायसी मोहीम यशस्वीरित्या राबवणाऱ्या ४ रास्त भाव दुकानदारांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार अनिल पुरे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र वितरण करण्यात आले. या सोहळ्याला नगराध्यक्ष आनंद पाटील, डॉ. उद्धव पाटील, परमेश्वर टिकारे यांची उपस्थिती लाभली. महसूल विभागातील पारदर्शक आणि प्रभावी सेवेसाठी नायब तहसीलदार अनिल नाडेकर, सहायक महसूल अधिकारी गजानन शिराळे, महसूल सहाय्यक भागवत गायकवाड, मंडळ अधिकारी कल्पना गोरले, ग्राम महसूल अधिकारी कल्पना पागृत, शिपाई समाधान पाटील, पोलीस पाटील नितीन गोरे, महसूल सेवक नारायण कोळी आणि निवडणूक शाखेचे ऑपरेटर मनोज तायडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ई-केवायसी ९०% पेक्षा अधिक पूर्ण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांमध्ये जलचक्र खुर्द येथील भागवत पाटील (९२.५६%), वडजी येथील यशोदा पाटील (९१.९६%), पळसखेडे बुद्रुक येथील सुभाबाई सुरवडे (९०.४१%) आणि वाकी येथील मंगलाबाई उबाळे (९०.१७%) यांचा सत्कार करण्यात आला. या कामगिरीने शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी झाली आहे.

तहसीलदार अनिल पुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महसूल सप्ताह केवळ एक औपचारिकता नसून नागरिकांशी जोडणारा संवेदनशील उपक्रम आहे. महसूल खात्याच्या विविध सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात, हा यामागील हेतू आहे. कार्यक्रमात बोलताना डॉ. उद्धव पाटील यांनी विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मंडळ अधिकारी कल्पना गोरले यांनी नागरिकांशी थेट संवादातून सेवा देण्यावर भर देण्याचे सांगितले. महसूल सहाय्यक भागवत गायकवाड यांनी ई-केवायसी मोहिमेचे महत्त्व विशद करताना, अन्नसुरक्षा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय अधोरेखित केले.

या कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, रास्त भाव दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. सूत्रसंचालन नायब तहसीलदार अनिल नाडेकर व मंडळ अधिकारी मोनिका बडगुजर यांनी संयुक्तरित्या केले. कार्यक्रमाच्या शेवटी नायब तहसीलदार नाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व महसूल विभागाच्या उपक्रमांना मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


Protected Content

Play sound