मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी, 3 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीएम मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. मराठी ही भारताची शान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल काल राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. तसेच 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. या प्रस्तावाचा आशय असा, मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. गेले दशकभर यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी भाषा समितीने मोठे काम केले. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालय , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून मराठीचा अखंड जागर सुरू ठेवला आहे. मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषकांसह मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरत आले आहे.