Home क्राईम कॅफेमध्ये पडद्याआड चालले होते अश्लील चाळे; रामानंदनगर पोलिसांचा छापा !

कॅफेमध्ये पडद्याआड चालले होते अश्लील चाळे; रामानंदनगर पोलिसांचा छापा !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील बेटावद येथील कॅफेमधील घटनेची गंभीर दखल घेत, जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘कॅफे कॉलेज कट्टा’ नावाच्या कॅफेवर आज, गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पोलिसांनी छापा टाकला. या कॅफेत शाळा आणि महाविद्यालयांतील मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. या प्रकरणी कॅफे चालकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त माहिती मिळाली होती की, ‘कॅफे कॉलेज कट्टा’ येथे गाड्यांमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून, पडदे लावून आणि अंधार करून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अश्लील कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आज दुपारी अचानक कॅफेवर छापा टाकला.

या छाप्यात, सात जोडपी अश्लील चाळे करत असताना रंगेहाथ पकडण्यात आली. पोलिसांनी त्यांना बाहेर बोलावून त्यांची माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या कॅफे शॉपमध्ये दर्शनी भागात कुठलाही परवाना लावलेला नव्हता. या प्रकरणी कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद, ता. जामनेर, सध्या लाडवंजारी मंगल कार्यालय, जळगाव) याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सूर्यवंशी आणि महिला पोलीस शिपाई स्वाती पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली. अशा प्रकारच्या कॅफेमुळे समाजात गैरप्रकार वाढू शकतात, त्यामुळे या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound