नवी दिल्ली वृत्तसंस्था | वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ओबीसी समुदायाला २७ टक्के आरक्षण मिळणार असल्याचा महत्वाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील निकालात दिला आहे. तर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकालाही आरक्षण मिळणार असले तरी यासाठी क्रिमी लेयरच्या मर्यादेवरील निर्णय हा नंतर घेण्यात येणार आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीटचा निकाल गेल्या महिन्यातच लागला असून याची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असतांनाच यातील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. तर ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी असणार्या आरक्षणातील क्रिमी लेअरची मर्यादा ही नेमकी किती असावा याबाबतही याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात निकाल लागला. यात सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय जागांमध्ये ओबीसी समुदायातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण राहणार असल्याचा महत्वाचा निर्णय दिला आहे. यामुळे नीट-पीजी मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबत आर्थिक दुर्बल घटकांनाही १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र यातील क्रिमी लेअर साठी उत्पन्नाच्या मर्यादेबाबत मार्च महिन्यात सुनावणी होणार असल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.