भुवनेश्वर (वृत्तसंस्था) ओडिशामध्ये नवीन मोटर वाहन कायद्यानुसार केलेल्या कारवाईत एका ट्रक चालकाला तब्बल साडेसह लाखाचा दंड आकारण्यात आला आहे.
देशभरात 1 सप्टेंबर 2019पासून नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आला. या कायद्यांतर्गत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. ओडिशामध्ये शैलेश शंकर लाल गुप्ता या ट्रक चालकाविरोधात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून वाहतूक परिवहन विभागाने तब्बल 6 लाख 53 हजार 100 रुपयांचा दंड आकाराला आहे. दरम्यान, ट्रक चालक गुप्तानं गेल्या पाच वर्षांपासून वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले होते. तसेच गेल्या पाच वर्षांपासून त्याने टॅक्सदेखील भरलेला नाही. ध्वनी, वायू प्रदूषण, विना परवाना गाडी चालवणे यांसह सामान्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 6 लाख 53 हजार 100 रुपयांचा दंड गुप्ताला ठोठावण्यात आला आहे.