Home Cities जळगाव आता महापौरपदासाठी चुरस : धक्का तंत्राचा वापर की लेवा समाजाला मिळणार संधी...

आता महापौरपदासाठी चुरस : धक्का तंत्राचा वापर की लेवा समाजाला मिळणार संधी ?


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट । आज जळगाव महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण हे ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने जाहीर झाल्यानंतर आता या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला भरभरून यश लाभले. यात भारतीय जनता पक्षाने 46, शिवसेनेने 22 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. शिवसेना-उबाठाच्या पाच जागा निवडून आल्या असून एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. यानंतर काल गटांची नोंदणी झाल्यानंतर आज मुंबईत महापौरपदाचे आरक्षण हे ओबीसी महिलेसाठी निघाले. यानंतर आता जळगावच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार ? याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीत अनेक ओबीसी महिला जिंकून आल्या आहेत. यातील लेवा पाटीदार समाजातील महिलेला महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्या अतिशय निष्ठावंत कार्यकर्त्या असून त्यांना महापालिकेचा चांगला अनुभव देखील आहे. यासोबत प्रभाग सातमधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांचे नाव देखील महापौरपदाच्या चर्चेत आहे. त्यांनी आधीच सभागृहात आपल्या कामाची छाप सोडली असून आता त्यांना महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक-12 मधून निवडून आलेल्या गायत्री इंद्रजीत राणे या देखील मोठ्या दावेदार आहेत. त्यांना देखील महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यासोबत माजी महापौर तथा पुन्हा निवडून आलेल्या जयश्री सुनील महाजन या देखील या पदाच्या दावेदार आहेत. त्या शिवसेना-उबाठा पक्षातून अलीकडेच भारतीय जनता पक्षात आलेल्या असल्या तरी महापौरपदी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्या नावाचा विचार होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने गटनेतेपदाची नोंदणी करतांना धक्कातंत्राचा वापर करत प्रकाश बालाणी यांच्याकडे धुरा सुपुर्द केली होती. याच प्रकारे धक्कातंत्राचा वापर झाल्यास प्रभाग 13 मधून बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली अमित पाटील यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यांचे पती अमित पाटील हे आ. मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासोबत प्रभाग-7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या अंकिता पंकज पाटील यांना देखील लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अर्थात, नॉन-लेवा पर्यायांचा विचार केल्यास या बाबी शक्य आहेत. अन्यथा वर नमूद केलेल्या नावांपैकी एकीला जळगावच्या महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रभाग ४ ब मधून निवडून आलेल्या विद्या मुकुंदा सोनवणे ह्या कोळी समाजाच्या असून त्या देखील ओबीसी आहेत, प्रभाग ८ अ मधून कविता सागर पाटील ह्या मराठा असून त्या ओबीसी आहेत आणि प्रभाग १० ब मधून बारी समाजाच्या माधुरी अतूल बारी या देखील ओबीसी असून यांच्या पैकी देखील महापौर पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound