मुंबई (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच राज ठाकरे यांना समन्स बजावले जाणार आहे. दरम्यान, इव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे हे आंदोलन करणार असून देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेत समर्थन मिळवीत असल्यामुळे भाजपामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. येणाऱ्या आठवड्यात हा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कोहिनूर मिल क्रमांक ३ विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मोठा प्रभाव पाडू शकतात. यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जाण्यासाठी इडीचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांना या कारवाईच्या निमित्ताने मुंबईतच अडकून ठेवण्याची योजना आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना वारंवार ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात येईल आणि तासनतास प्रतिक्षा करत बसवून ठेवण्यात येईल. याआधी ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकारी यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता राज ठाकरे यांना चौकशीसाठी समन्स बजावला जाणार आहे.दरम्यान, राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यापासून भाजपामध्ये चिंतेचे वातावरण आहे.