नवी दिल्ली (वृत्तसंस्था) किंगफिशर आणि जेट एअरवेजनंतर आता पवनहंस हेलिकॉप्टर कंपनीही आर्थिक संकटात सापडली आहे. सन २०१८-१९ मध्ये कंपनीला सुमारे ८९ कोटी रुपयांचे नुकसान झालेय. कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्जही आहे. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून आता कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. दरम्यान, सरकारने गेल्या वर्षी पवनहंस विकण्याचा प्रयत्न केला होता.
पंवनहंसला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे मार्ग शोधले जात असून त्याचाच एक भाग म्हणून पवनहंसने कॉस्ट कटिंगही सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना आता ओव्हरटाइमचे अतिरिक्त पैसैही मिळणार नाहीत. दरम्यान, कंपनीच्या स्थितीला कंपनीच जबाबदार असल्याचे म्हणत कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी दर्शवलेली आहे. कंपनीची स्थिती बिघडण्यामागे रोहिणी हेलिपोर्टवर खर्च करण्यात आलेले सुमारे १२५ कोटी रुपये हे देखील एक कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हे हेलिपोर्ट सुरुवातीचे काही दिवस चालले, मात्र नंतर ते शटडाउन केले गेले.