मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडेच शिवसेनेच्या आमदारांमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता या पक्षाच्या खासदारांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव टाकत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली आहे.
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा; अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना दिले.
यात त्यांनी म्हटले आहे की, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत महाराष्ट्राची कर्तृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्त्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता.
हीच परंपरा कायम ठेवत आदिवासी समाजातील एका कर्तृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा. अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे. यावर आता उध्दव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.