पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला असून बुधवारी (ता. ३१) सायंकाळी राज्यभरातील अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मात्र, याआधी करण्यात आलेल्या चर्चेनुसार अधिक रक्कम मिळेल अशी अपेक्षा असलेल्या महिलांमध्ये काहीशी नाराजीही दिसून येत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता प्रलंबित होता. दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये, तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र मिळून एकूण ४ हजार ५०० रुपये खात्यात जमा होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात केवळ नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा एकच हप्ता जमा झाल्याने वर्षाच्या सरतेशेवटी सरकारने अपेक्षेपेक्षा कमी रक्कम दिल्याची भावना अनेक लाभार्थींनी व्यक्त केली आहे.

डिसेंबर महिना संपत आलेला असतानाही फक्त एकाच महिन्याचा हप्ता मिळाल्याने काही लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग झाला असला, तरी खात्यात रक्कम जमा झाल्याने समाधान व्यक्त करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आर्थिक मदतीची ही रक्कम घरखर्चासाठी उपयोगी ठरणार असल्याचं मत अनेक महिलांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर होती. ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा या योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे किंवा ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात येऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडे आता लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
काही महिलांना खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएस अद्याप प्राप्त झालेला नाही. तांत्रिक अडचणी किंवा बँक सर्व्हरच्या कारणामुळे मेसेज उशिरा येणे किंवा न येणे, असे प्रकार घडतात. अशा वेळी बँक पासबुक अपडेट करून, मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय अॅपद्वारे बॅलन्स तपासणे, एटीएममधून लास्ट ट्रान्झॅक्शन पाहणे किंवा बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून खात्यातील रकमेची खातरजमा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
एकूणच, नववर्षाच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अपेक्षित एकत्रित हप्ता न मिळाल्याने आणि ई-केवायसीची अट कडक झाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता कायम आहे.



