मनवंतराव साळुंखे यांची अशीही माणुसकी
अमळनेर ईश्वर महाजन । कोणत्याही देवस्थानाला दर्शनाला गेल्यानंतर तेथील दानपेटीमध्ये पैसे न टाकता या परिसरातील विक्रेत्या मुलांना मदत करण्याचे काम मनवंतराव साळुंखे हे करत असून या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.
समाजात काही माणसे आपल्या कर्तुत्वाने इतकी मोठी व आदरणीय होतात, त्यामुळे समाजाचे भूषण व अलंकार बनतात. त्यांच्या कामामुळे समाज ओळखला जातो. असेच शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा काम गेल्या काही वर्षापासून उपक्रमशील मुख्याध्यापक साळुंखे करीत आहेत. पारोळा येथिल रहिवासी जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व त्यांचे लहान बंधु गुणवंतराव साळुंखे माध्यमिक शिक्षक भिलाली हे त्यांच्या मोठया मुलाचे लग्न झाल्याने वधु वरासह देव दर्शनासाठी सहपरिवार गेले होते. देवस्थानावर गंधकाचा टिळा लावणारी लहान बालके, भिकारी, पुजारी, व इतर पैसे मागणारे देहु आळंदीला मागच्या वेळी बघितलेले असल्याने मुख्याध्यापक साळुंखे यांनी घरूनच ठरविले होते व संकल्प केला होता की देवस्थानावर दानपेटीत पैसे टाकणे, अभिषेक करणे या पेक्षा मंदिराबाहेर शाळा बुडवुन कपाळाला टिळा लावणारे, पूजा साहित्य विकणारे किंवा किरकोळ साहित्य विक्री करणार्या विद्यार्थ्यांना थोडा वेळ का असेना शाळेचे महत्व पटवायचे व त्यांना मंदिरात दान देण्यापेक्षा काहीना काही आर्थिक मदत करायची.
सुरुवातीला तुळजापूर भवानी मंदीराच्या बाहेर भाविकांना गंध लावणारे चार पाच लहान मुले हातात गंधकाचा डबा घेवुन दर्शनार्थींच्या मागे मागे फिरतांना दिसले. याचे नाव सुरेश भीमराव कांबळे झ्यत्ता ७ वी जि प शाळा तुळजापूर असून त्याचे आई वडील मजुरी करतात. पत्र्याचे घर असुन नेहमी शाळा बुडवुन या ठिकाणी गंध लावण्याचे काम करतो. पंधरा-वीस रुपये मिळतात. त्याला शाळा न बुडविण्याचे व सुटीच्या दिवशी व शाळेअगोदर व नंतर हे काम करण्याचे समजुन त्याला शाळेच्या कामासाठी हजार रुपये मदत दिली. तो पैसे घेईना. त्याची साळुंखे मजा घेत आहेत की काय असे त्याला वाटले.बळजबरी त्याच्या हातात पैसे कोंबल्यावर त्याने घेतले. अक्कलकोट येथेही पूजेचे फुले विकणारी अपंग मुलगी सुरेखा सजन माळी इ ४थी जि प शाळा अक्कलकोट वडील वारलेले आई मजुरी करते. दोन लहान भाऊ घरही व्यवस्थित नाही. तीही चिमुरडी शाळा बुडवुन मोठया कष्टाने पूजेचे साहित्य विक्री करतांना आढळुन आली. तीला शिक्षण व अपंगाच्या सवलती सांगुन हजार रुपये भेट दिल्यावर भांबावुन गेली. मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी सौ चित्रा पाटील यांनी तिला ते पैसे आता रोज शाळा न बुडवता आईला देण्यास सांगुन तीला दिले. गुणवंतराव साळुंखे यांनी अक्कलकोटला दानपेटीत पैसे न टाकता मोफत अन्नछत्र चालविले जाते हे बघुन त्यासाठी यथाशक्ती पाच हजाराची मदत दिली. पंढरपुरला भेट दिल्यावर मंदीराच्या बाहेरही चारपाच मुले गंध लावण्याचे काम करतांना दिसले. संध्याकाळची वेळ होती. चौकशी केली तर काही शाळा करुन आले होते. त्यात एका मोठ्या वाटणार्या मुलाकडुन गंध लावुन घेतल्यावर त्याची चौकशी केली. तो इ १० वीत कवठेकर हायस्कुल पंढरपुर येथे शिकणारा सुरज रामदास लष्करे होता. तोही बर्याच वेळा शाळा बुडवुन घरच्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी हे टिळा लावण्याचे काम करतो. त्यालाही शिक्षण घेण्याचे व त्यातुन आपले जीवन सुधारण्याचे सांगुन त्याच्या शिक्षणासाठी मुख्याध्यापक साळुंखे यांनी दोन हजार पाचशे रुपयांची मदत केल्याने त्याला काही सुचेनासे झाले. त्याला समजाविले तेव्हा त्याने घेतल्या. विठोबाच्या मंदिरा बाहेर जणु विठोबाच पावला असा आनंद त्याच्या चेहर्यावर दिसत होता. हीच गोष्ट जेजुरीला मंदीरांच्या पायर्यांवर लहान मुलींची पर्स विकणारा इ ७ वीत जि प मराठी जेजुरी शाळेत शिकणारा गणेश पावबा धनगर.आई वारलेली घरी दोन बहिणी, वडील हात मजुरी करतात. त्याच्याशी बोलण्याच्या बहाण्याने पाच पर्स अडीचशे रुपयात घेतल्या. त्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये दिले. तेव्हा तोही कमालीचा गोंधळुन गेला. त्यालाही मग सर्व समजावे लागले. लहानसा जीव..त्याला रडु आले. नियमित शाळेत जाण्याचे त्याच्या कडुन वचन घेतले.
याबाबत मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे म्हणाले की जवळच्या लोकांचे ठिक आहे पण हजार पाचशे किलोमिटरचा प्रवास करुन तुळजापूर व पंढरपूर येथे येणारे भाविक भक्त पाच सहा तास रांग लावतात, गोल गोल घुमविले जाते. पण देवाच्या मुर्तीचे दर्शनही होत नाही तो पर्यंत एका सेकंदात तेथील कर्मचारी दूर ढकलतात. तेव्हा मनाला खुप वाईट वाटते. प्रत्येक ठिकाणी जागोजागी फक्त दर्शनाला येणार्यांकडुन पैसा उकळला जातो. तेथे फोटो काढणारे असतात त्यांचा फायदा व्हावा म्हणुन मोबाईल जमा करा, मोबाईलवर फोटो काढण्यावर बंदी केली जाते. देवस्थानावर जाण्याला व दर्शन घेण्यास माझा विरोध नाही पण सध्याची स्थिती बघुन खुप त्रास, हाल व आर्थिक लुटमार होते. तरीही देवाचे दर्शन नीट होतच नाही. यासाठी जे आपल्या आजुबाजुला गरजवंत आहेत, रंजले गांजले आहेत, दिनदुबळे बालक, भुकेलेले मुके प्राणी पशु पक्षी आहेत त्यांच्यातच देव बघावा. देवावरील अभिषेकाला पैसा खर्च करण्यापेक्षा गरीब बालकांना तो शिक्षणासाठी दयावा. मंदिराच्या दानपेटीत हजारो रुपये, दागदागिणे, सोने नाणे टाकण्यापेक्षा गरवंताची मदत करावी, मुक्या प्राण्यांना अन्न पाणी चारा टाकावा. देव प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही. मी तर संकल्प केला आहे व राज्य पुरस्काराचे एक लाख दहा हजार रुपये असेच गरजवंत बालक, झाडे लावणे व मुक्या प्राण्यांवर खर्च करण्याची सुरुवात केली आहे व तो पैसा संपल्यावर जीवनभर शक्य तेवढा पैसा यासाठी खर्च करणार आहे.
दरम्यान, मनवंतराव साळुंखे यांचा हा अभिनव उपक्रम आणि त्यांच्या संकल्पाचे कौतुक करण्यात येत आहे.