जळगाव, प्रतिनिधी | महिला हक्क व सरक्षक विषयक कायद्याबद्दल जनजागृती वाढल्यानेच तसेच अन्यायाविरोधात तक्रार करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यानेच अनेक महिला आपल्यावरील अन्यायाच्या तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवित आहेत. आयोग हा महिलांच्या हिताकरीता स्थापन झाला आहे. विभागीय स्तरावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरही सुनावणी व्हाव्यात यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
जळगाव महापालिकेच्या एनएलएमयु द्वारा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शासनाच्या प्रज्वला योजनेच्या महिला सक्षमीकरणाअंतर्गत बचत गटांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार राजुमामा भोळे, महापौर सिमा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, अस्मिता पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार राजूमामा भोळे यांनी केले. महिला बचत गटांचे प्रशिक्षण तीन सत्रात घेण्यात आले. यात पहिल्या सत्रात आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात कार्यशाळेत योजनांबद्दलची कायदेविषयक, सामाजिक तसेच अर्थिक, व्यावसायिक माहिती माहिती अर्चना वाणी व देवयानी ठाकरे, गायत्री पाटील, आशा चौधरी यांनी दिली. तर तिसऱ्या टप्प्यात महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक अधिकारी आतिफ शेख यांनी बचत गटांसंबधित मार्गदर्शन केले. रहाटकर यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि शासन योजनांची माहिती देऊन सक्षमीकरण करणे हा प्रज्वला योजनेचा उद्देश असल्याचे सांगितले. योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीकरिता बचत गटाचे माध्यम निवडून प्रत्येकीपर्यंत पोहोचणे शक्य होत असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी दससूत्री योजनेतील प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मुद्रा योजना, सुमतीताई सुफेकर योजना, राज्याचे महिला केंद्री उद्योग धोरण आणि उज्ज्वला गॅस योजनेविषयी माहिती देताना उपस्थितांपैकी लाभार्थ्यांची आणि बँक सखींची नोंद घेतली. याप्रसंगी नगरसेविका सरिता नेरकर, उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, उज्वला पाटील, पार्वताबाई भिल, शुचिता हाडा, गायत्री राणे आदी उपस्थित होते.
आगामी महिन्याभरात शहरात ‘सक्षमा केंद्र’ उभारणार : आयुक्त डॉ. टेकाळे
महिला आयोगाच्या पत्रानुसार ‘सक्षमा केंद्राबाबत’ महापालिकेच्या अर्थ संकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. महिलांना येणाऱ्या अडीअडचणी त्यासाठी महिलांना मार्गदर्शन, सल्ला आदींचा समवेश ह्या ‘सक्षामा केंद्रात’ असणार आहे. या केंद्राची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. आगामी महिन्याभरात हे केंद्र सुरु होईल अशी ग्वाही आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी यावेळी दिली.