छत्तीसगड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । छत्तीसगड–आंध्र प्रदेश सीमावर्ती जंगलांमध्ये आज सकाळी घडलेल्या भीषण चकमकीत देशातील सर्वाधिक वाँटेड नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना अभूतपूर्व यश मिळाले. तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर असलेला आणि शेकडो हत्यांचा सूत्रधार ठरलेला हिडमा ठार झाल्याने सुरक्षा यंत्रणांनी मोठा निश्वास टाकला आहे. सहा माओवादी ठार झालेल्या या कारवाईमुळे नक्षल संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वावर मोठा आघात झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
छत्तीसगड–आंध्र प्रदेश सीमेला लागून असलेल्या मारेदुमिल्ली परिसरात आंध्र प्रदेश पोलिसांनी सकाळी सहा वाजता विशेष छापा टाकला. माओवादी मोठ्या बैठकीसाठी एकत्र जमल्याचे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई राबविण्यात आली. पोलिसांनी वेढा घालताच माओवादींकडून गोळीबार सुरू झाला, त्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी सहा माओवादीांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. यामध्ये केंद्रीय समिती सदस्य आणि पीएलजीए बटालियन क्रमांक 1 चा प्रमुख माडवी हिडमा ठार झाल्याची पुष्टी सूत्रांनी केली आहे.

43 वर्षीय हिडमा हा 2013 मधील दरभा व्हॅली हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार होता, ज्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह 27 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे 2017 च्या सुकमा हल्ल्यातही हिडमाचं प्रमुख नेतृत्व होतं. 2010 च्या दंतेवाडा हल्ल्यात 76 सीआरपीएफ जवान शहीद झाल्याची भीषण घटना देखील त्याच्याच रणनितीमुळे घडली होती. देशभरातील 26 मोठ्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या या माओवादी कमांडरला सुरक्षा दलांनी सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत ठेवले होते.
हिडमा वयाच्या केवळ 14व्या वर्षापासून माओवादी संघटनेत सक्रिय झाला होता. उत्तम गुरिल्ला युद्धकौशल्य, जंगलांची भौगोलिक जाण आणि स्वतःभोवती 40 सशस्त्र माओवादींची कायम सुरक्षा ठेवणारा हा नेता नक्षल संघटनेसाठी ‘आयकॉनिक कमांडर’ मानला जात होता. त्याची दुसरी पत्नी राजे उर्फ राजक्का देखील या चकमकीत ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे.
या कारवाईनंतर बस्तर परिसरातील नक्सल नेटवर्कला मोठा धक्का बसणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिडमाच्या मृत्यूनंतर माओवादी संघटनेच्या रणनीतीत मोठे बदल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, “मारेदुमिल्ली येथे सकाळी 6 ते 7 दरम्यान झालेल्या चकमकीत एका प्रमुख माओवादी नेत्यासह सहा जणांचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या जंगलात व्यापक शोध मोहीम सुरू आहे.”
सुरक्षा दलांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कपाळावर आठ्या चढणार हे निश्चित असून या ऑपरेशनला गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठे यश मानले जात आहे



