चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चंद्रपूरातील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातल्या शाही दरबार हॉटेलमध्ये ही गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये, हाजी सरवर गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हाजीचा मृत्यू झाला आहे. गोळीबारासोबत हाजी सरवर चाकू हल्ला देखील करण्यात आला होता.
प्राथमिक माहितीनुसार ५ अज्ञातांनी हा गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत असून सध्या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. हाजीवरील हल्ल्याच्या घटनेने परिसर हादरला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे, तसेच याप्रकरणी अधिक तपासही सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या ४० दिवसातली ही गोळीबाराची चौथी घटना आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वात कायदा आणि पोलिसांचा वचक उरलाय की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
गोळीबारात हाजी सरवरचा मृत्यू झाला असून त्याचा एक साथीदार शिवा गोलेवार हा देखील २ गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. हाजीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात चिकित्सा कक्षात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान हाजीचा झाला मृत्यू झाल्याची माहिती आहे. हाजी हा आपल्या ४ साथीदारांसह हॉटेल शाही दरबार येथे जेवणासाठी पोहोचला होता, त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला. येथील गुंड टोळ्यांच्या वर्चस्वाच्या संघर्षातून त्याच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून शवविच्छेदनासाठी त्याचे पार्थिव शव चिकित्सागृहात नेण्यात आले आहे.