मुंबई प्रतिनिधी | ईडीने पाठविलेल्या नोटीसा या आमच्यासाठी प्रेमपत्रासारख्याच आहेत, त्यांना आम्ही कायदेशीर मार्गाने योग्य ते उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिली आहे.
काल सायंकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कितीही नोटिसा पाठवा. आम्ही घाबरणारे आणि डगमगणारे नाही. भाजपच्या नेत्यांना या या दिवशी अनिल परबांना चौकशीला बोलवणार हे कसं कळतं? किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कळतं… अजून दहा लोकांना महितीय… काय चाललंय? नोटिसा पाठवा, प्रेम पत्र आहेतही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाठवलेली. आम्ही त्यांना उत्तर देऊ.. आमच्यावर कायदेशीर कारवाई होतेय म्हणून आम्ही पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना धमक्या वगैरे देणार नाही. आम्ही या प्रक्रियेला पूर्ण सामोरं जाऊ, अनिल परब उत्तर देण्यास समर्थ आहेत, असं राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अनेक लोक आहेत. अनिल देशमुखही मुख्यंत्र्यांच्या शरद पवारसाहेबांच्या जवळचे होते. अनिल परबच नाही तर अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे नोटिसा पाठवल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही. हरियाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांवर हल्ला झाला. जालियनवाला बाग हत्याकांडासारखा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांनी रक्त सांडलं. या रक्ताची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.