चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने पळविले असल्याची फिर्याद शहर पोलिसात नोंदविण्यात आलेली होती. मात्र ‘त्या’ मुलाचे अपहरण नव्हे; तर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील हूडको कॉलनीतील शेख साखीर शेख कासम यांचा मुलगा अय्यान उर्फ सोनू शेख साखीर (वय-१४) हा सोमवार,४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरच्यांना घराबाहेर खेळायला जातो म्हणून सांगून गेला. मात्र तो घरीच न परतल्यामुळे घरच्यांनी त्याला परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली. मात्र अय्यान उर्फ सोनू शेख साखीर हा मिळून न आल्यामुळे वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाने फुस लावून पळविल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र अय्यान उर्फ सोनू शेख साखीर या बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रोजी सकाळी १०:१५ वाजताच्या पूर्वी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात तपास सपोनि बिरारी हे करीत होते. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.



