जळगाव प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था सांभाळतांना तसेच वाहन तपासणी करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. अशा सुचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिल्या. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज रावेर व जळगांव लोकसभा मतदार संघातील कायदा व सुवस्था, वाहन तपासणी व अवैध वाहतुक, मतदान प्रक्रियेसाठी पोलीस अधिका-यांनी घ्यावयाची काळजी याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांचा बंदोबस्ताबाबत आढावा घेतला .यावेळी डॉ. ढाकणे बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे उपस्थित होते.
श्री. ढाकणे यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार लोकसभा निवडणूक पार पाडावयाची असून यासाठी रावेर व जळगांव लोकसभा मतदार संघात येणा-या पोलीस स्टेशननिहाय कायदा व सुवस्थेबाबतचा आढावा घेतला. तसेच वाहन तपासणीत रोख रक्कम आढळल्यास संबंधितांनी त्याचे आवश्यक कागदपत्रे दाखविल्यास त्यांना त्रास होणार नाही याची दक्षताघेण्याच्यासुचना दिल्यात. यावेळी डॉ. ढाकणे यांनी पोलीस अधिका-यांनी मतदान प्रक्रियेत येणा-या अडचणी व मतदान केंद्राच्या आत एखाद्या अक्षेपार्य घटनेबाबत फिर्याद कोणी नोंदवावी आदि शंकांचे निरसण केले.
डॉ. ढाकणे यावेळी म्हणाले की, मतदानाच्या ४८ तासापूर्वी प्रचार बंद होईल. या कालावधीत कोणत्याही वाहनांवर निवडणूक चिन्ह अथवा बॅनेर लावून वाहने चालवित असतील तर अशी वाहने तातडीने जप्त करावीत व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. निवडणूक कामासाठी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची सेवा घेण्यात आली असली तरी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी १२ नंबरचा फॉर्म तातडीने भरुन सबंधित यंत्रणेकडे जमा करावा. जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रमुखांनी १२ नंबरचे पुरेसे फॉर्म उपलब्ध करुन घ्यावेत, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना निवडणूकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रावर मतदानाचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. यावेळी पोलीस उपअधिक्षक निलभ रोहण, पोलीस उपअधिक्षक केशव पातोंड व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.