ओस्लो (वृत्तसंस्था) नॉर्वेतील मच्छिमार एका शुभ्र बेलुगा व्हेल माशाच्या गळ्यात कॅमेरा पाहून आश्चर्यचकित झाले. या माशाच्या गळ्यात पट्ट्यासारखे काहीतरी गुंडाळल्याचे मासेमारांना दिसले. हा व्हेल मासेमारांच्या जहाजाच्या दिशेनेच येत होता. हा प्रकार सामान्य नसून तो गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा असावा, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बेलुगा व्हेलमाशाला बोली भाषेत पांढरा व्हेल म्हणतात. हा व्हेल प्रजातीतील सर्वात छोटा व्हेल आहे. बेलुगा व्हेलचा आकार २० फुटांपर्यंत असतो. हा व्हेल सर्वसाधारणपणे आर्कटिन महासागरात आढळतो.
बेलुगा व्हेलच्या गळ्याला बांधण्यात आलेल्या पट्ट्यावर इक्युपेमंट ऑफ सेंट पीट्सबर्ग असे लिहिलेले आहे. यावरून हा व्हेल रशिया या देशाचा हेर असावा, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. रशियाकडे अनेक घरगुती व्हेल आहेत, हे सर्वांनाच माहित असल्याचे आर्कटिक विद्यापीठात मरीन बायॉलॉजीचे प्रोफेसर आडन रिकॉर्ड्सन यांनी म्हटले आहे. या व्हेलपैकीच काही त्यांनी समुद्रात सोडले असण्याची शक्यता असल्याचे रिकॉर्ड्सन म्हणाले. व्हेलच्या गळ्यातील कॅमेरा हा रशियातील संशोधकांचा असण्यापेक्षा तो रशियाच्या नौसेनेचा असण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.
रशियाने या पूर्वी समुद्री जीवांच्या मदतीने अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. शीतयुद्धादरम्यान रशियाने सबमरीन आणि फ्लॅगमाइन्ससाठी डॉल्फिन माशांचा वापर केला होता. या बरोबरच जहाजांच्या संरक्षणासाठीही समुद्री जीवाचा वापर करण्यात आलेला आहे. सन १९६० मध्ये अमेरिकी नौसेनेनेही बेलागस, डॉल्फिन आणि इतर समुद्री जीवांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम सुरू केले होते.
रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे ही या बाबतीत मागे नाहीत. समुद्री जीवांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमांची त्यांनी नव्याने सुरुवात केली आहे. क्रायमियाची आक्रमकता पाहता त्यांनी डॉल्फिन कार्यक्रम पुन्हा सुरू केला होता.