उत्तर महाराष्ट्राला सिंचन निधीतून सर्वाधिक हिस्सा मिळणार : ना. महाजन (व्हिडीओ)

na girish mahajan news

जळगाव, प्रतिनिधी | राज्यातील अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यातला सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे ५२०० कोटी रुपये उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील ३२ अपूर्ण प्रकल्पांवर ही रक्कम खर्च केली जाणार असून जिल्यातील सगळेच प्रकल्प त्यामुळे येत्या काही वर्षात पूर्ण होतील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज (दि.११) येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

 

ना. महाजन यावेळी पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने राज्यातील सगळे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावरच गेल्या पाच वर्षात भर दिला. एकही नवा प्रकल्प आम्ही हाती घेतला नाही. त्यामुळे राज्यातील ८१ प्रकल्प पूर्ण झाले असून आता ३२ प्रकल्पांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. त्यातून येत्या तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण होतील. आमच्या सरकारने सिंचनासाठी आतापर्यंत सगळ्यात अधिक निधी खर्च केला असून सुमारे ६० हजार कोटी त्यावर खर्च केले आहेत. अनेक प्रकल्प सुधारित मान्यतेअभावी रखडले होते, ते कामही आम्ही पूर्ण केले आहे. राज्यातील सिंचनाखाली आलेल्या क्षेत्रातही त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गाळ काढण्याची महत्वाकांक्षी योजना :- राज्यातील बहुतेक धरणात कमी-अधिक प्रमाणात गाळ साचला असून त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे, त्यामुळे लवकरच हा गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कामावर खर्च होणार नसून उलट सरकारला त्यातून महसूल मिळणार आहे.

नदीजोड प्रकल्पावर लक्ष केंद्रीत :- गेल्या पाच वर्षात राज्यात सरकारने जवळपास ५० हजार कोटींचे दुष्काळी अनुदान वाटले. तेवढा निधी जर सिंचनावर खर्च झाला तर राज्यात कुठेच दुष्काळ राहणार नाही. याच दिशेने राज्यात नदीजोड प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यामध्ये जास्त पर्जन्यमान असलेल्या भागातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागातील नद्यांमध्ये आणून दुष्काळ निवारण केले जाणार आहे.

जागावाटप चर्चा सुरु :- आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटपावर चर्चा सुरु असून युतीच्या मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुमारे २० जागा सोडून इतर जागांचे वाटप सेना-भाजपमध्ये केले जाईल. आमचे विद्यमान आमदार असलेल्या जागा शक्यतो आमच्याकडेच राहतील, त्यामुळे जळगावची जागा भाजपाकडेच असेल, असेही ते म्हणाले. आमच्या पक्षाचे अंतिम जागा वाटप दिल्लीहून केले जाते, त्यामुळे कुणाकुणाला तिकीट मिळेल ते मी आताच सांगू शकत नाही, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

अमृत योजनेला गती देणार:- जळगाव शहरातील अमृत योजनेचे काम सध्या संथ गतीने सुरु आहे, पण पावसाची अडचण दिसते आहे, पण लवकरच कंत्राटदाराला हे काम वेगाने करण्याची सूचना दिली जाईल, त्यांना तशी नोटीस देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले आहे.

विरोधक वैफल्यग्रस्त :– राज्यातील विरोधीपक्ष वैफल्यग्रस्त झाले असून ते काहीही बोलत आहेत. काही दिवसांपूर्वीची शरद पवारांची प्रतिक्रिया आणि जिल्ह्यातील डॉ.सतीश पाटील यांनी मला दिलेले आव्हान किंवा नाना पाटोळेंनी लोकसभेच्यावेळी केलेले वक्तव्य त्याचेच उदाहरण आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

वकील बदलला नाही :- घरकुल प्रकरणात उच्च न्यायालयात सरकारने वकील बदलला नसून या आधीच्या वकिलांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी आता खटला लढणारे त्यांचे सहकारी वकील प्रभारी म्हणून काम पाहत होते. आता त्या पदावर नव्या व्यक्तीची नियुक्ती झाली असल्याने ते काम बघणार आहेत तर आताचे वकील त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी म्हणून काम पाहणार आहेत, त्यामुळे वकील बदलले म्हणणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/388550211835756/

Protected Content