जळगाव, प्रतिनिधी | आमदार भोळे यांनी गेल्या एका वर्षात कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याने सगळे महत्वाचे निर्णय खोळंबले आहेत. त्यांनी सगळे निर्णय स्वत:च घेण्याचा अट्टाहास केला असून सत्तेचे विकेंद्रीकरण केले नाही, पदाधिकाऱ्यांना कामच करू दिलेले नाही. असा आरोप आज मनपातील शिवसेनेचे गटनेते सुनील महाजन यांनी महासभेनंतर ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना केला.
ते पुढे म्हणाले की, विकास करण्यासाठी ठोस आणि कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण मतांच्या राजकारणामुळे तसे निर्णय घेतले जात नाहीत. गाळे प्रश्न, हुडको, जे.डी.सी.सी. बँक प्रश्न, सगळेच गेल्या वर्षात पेंडिंग आहेत. साधी खड्डे बुजवण्याची फाईल एका टेबलावर दोन महिने पडून होती, यावरूनच कामांचा वेग लक्षात येतो, असेही ते यावेळी म्हणाले. आज (दि.३) झालेली महासभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आजच्या सभेत बरेचसे विषय हे प्रशासनाकडून आलेले भू-संपादनाचे विषय होते, त्यात वादासारखे काहीच नव्हते, म्हणून सभा खेळीमेळीत झाली. विकास कामात आम्ही नेहमीच सत्ताधाऱ्यांसोबत राहू, असेही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.