नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आजच्या अर्थसंकल्पात देशभरातील प्राप्तीकरदात्यांना शेवटी गोड बातमी देऊन पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली.
आजच्या अर्थसंकल्पात आयकराच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल असे मानले जात होते. या माध्यमातून मध्यमवर्गाला दिलासा देण्यात येइल असा युक्तीवाद केला जात होता. केंद्र सरकारने अलीकडेच गरीब सवर्णांना आरक्षण देण्यासाठी आठ लाखांची मर्यादा आखून दिली आहे. यामुळे एकीकडे यापेक्षा कमी रक्कम कमावणार्याला आयकर भरावा लागत असतांना आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्न असणार्याला आरक्षण ही बाब दुटप्पीपणाची असल्याची टीका करण्यात येत होती. यामुळे आयकर उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र पियुष गोयल यांनी यात प्रारंभी यात कोणताही बदल न केल्यामुळे मध्यमवर्गाची निराश झाली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांनी पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असल्याची घोषणा केली.
यामुळे आता ५ लाख उत्पन्नापर्यंत कोणताही कर लागणार नाही. ५ ते १० लाख उत्पन्न असणार्यांना १० टक्के तर १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास २० टक्के कर लागणार आहे. या नवीन कर प्रणालीचा देशातील तीन करोड करदात्यांना लाभ होणार असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली.