Home Cities जळगाव मानवी वस्तीत सांडपाणी प्रकल्प नको! जळगावात प्रस्तावित प्रकल्पाविरोधात नागरिकांचा तीव्र आक्षेप

मानवी वस्तीत सांडपाणी प्रकल्प नको! जळगावात प्रस्तावित प्रकल्पाविरोधात नागरिकांचा तीव्र आक्षेप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून, या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हरीविठ्ठल नाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य वीज उत्पादक कंपनीसोबत करार केल्याचे समोर आले असून, त्यासाठी पिंप्राळा गट क्रमांक ३३४ येथील जागा भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे मानवी वस्तीपासून दूर असणे आवश्यक असताना सदर प्रकल्प थेट रहिवासी परिसरात उभारण्याचा निर्णय चिंताजनक आहे. प्रस्तावित जागेच्या आजूबाजूला बिबानगर, शांतीनगर, नारायण नगर, जलाराम नगर यांसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागांचा समावेश असून, येथे मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. उतारवयात प्रतिकारशक्ती कमी असल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकल्प पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागील भिंतीलगत प्रस्तावित असून, या शाळेत तीन ते पंधरा वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लहान मुलांच्या आरोग्यावर सांडपाणी प्रकल्पाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पालकवर्ग व नागरिकांनी नमूद केले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेची असताना, मानवी वस्तीत प्रकल्प राबवून आरोग्यधोका निर्माण करणे हे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी, गटधारक व जय शिवराय बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्यावतीने महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी हरकत सादर करण्यात आली आहे. सदर खुली जागा ही उद्यान, लहान मुलांच्या खेळासाठी व नागरिकांच्या आरोग्यास पूरक उपक्रमांसाठी वापरण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या जागेवर सांडपाणी प्रकल्प उभारण्याऐवजी मानवी वस्तीपासून दूर पर्यायी ठिकाण निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

नागरिकांनी आपल्या निवेदनात स्पष्ट इशारा दिला असून, सदर प्रकल्पाच्या जागेत बदल न केल्यास आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असे नमूद केले आहे. भविष्यात यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा आरोग्यविषयक गंभीर परिणाम झाल्यास त्यास जळगाव शहर महानगरपालिका व संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश दामू भोळे, जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.

एकूणच, पिंप्राळा परिसरातील सांडपाणी प्रकल्पाच्या प्रस्तावामुळे जळगाव शहरात आरोग्य, पर्यावरण व नागरी हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन या हरकतींची दखल घेऊन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound