मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्याने नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. प्रतिस्पर्धी पक्षाच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षातून फुटून जाण्याची हिंमत कुणीही ‘माईका लाल’ करणार नाही. कुणी तशी हिंमत केलीच तर तो पुन्हा आमदार म्हणून निवडून येणार नाही,’ असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नवनिर्वाचित आमदारांना दिला आहे.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजपचे सरकार बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केले होते. राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे. कामाला लागा, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचे राणे मंगळवारी म्हणाले होते. राणे यांच्या या वक्तव्याबद्दल अजित पवार यांना विचारले असता त्यांनी आमदार फुटण्याची शक्यता फेटाळून लावली. ‘फुटलेला एकही आमदार पुन्हा निवडून येऊ शकणार नाही,’ असे ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेची फसवणूक केल्याचा आरोपही राणेंनी केला होता. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. ‘राणेंचं वक्तव्य फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.