मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाला आता कोणताही प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचे शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आता कोणताही प्रस्ताव येणार नाही, किंवा जाणार नाही, लोकसभा निवडणुकीपूर्वी जे ठरलेय तेच होणार. काहीही झाले तरीही चालेल मुख्यमंत्री मात्र शिवसेनेचाच होणार, असे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केली आहे असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. मराठवाड्यात उद्धव ठाकरे दौऱ्यावर गेले होते. तसेच आदित्य ठाकरेही अनेक भागांमध्ये गेले होते. शेतकरी आणि कष्टकरी शिवसेनेकडे आशेने पहात आहेत. काहीही झाले तरीही चालेल मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच आता नव्याने काय सांगायचे? कुठलाही नवा प्रस्ताव नाही जे आधी ठरलंय तेच शिवसेनेचे म्हणणे आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेची मुदत संपण्याला अवघे ३ दिवस उरले असतानाही राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. शिवसेने प्रस्ताव द्यावा, मु्ख्यमंत्रिपदाबाबात भारतीय जनता पक्षाची तयारी आहे, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले असले तरी देखील भाजपच्या हे म्हणणे शिवसेनेने फेटाळून लावले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या भेटी घेत असून राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनवा, अशी मागणी शेतकरी त्यांच्याकडे करत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.