मुंबई प्रतिनिधी । केंद्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे सुचविले असले तरी राज्य शासनाचा मात्र याला विरोध असून महाराष्ट्रात परीक्षा घेऊ नये अशी भूमिका आज पुन्हा घेण्यात आली आहे.
आज दुपारी १ वाजता राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्ष न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा निर्णय झाला. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नसल्याची भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कालच मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? असंही उदय सामंत यांनी विचारलं आहे. तसंच करोना गेल्यानंतर परीक्षा घेण्याचा घेण्याची तयारी आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रासह पंजाब, ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांनाही जाहीरपणे आपला विरोध दर्शवला आहे. तर केंद्राने मात्र युजीसीच्या निर्देशानुसार परीक्षा घ्यावे असे सुचविले असून यावर आता केंद्र व राज्यांमध्ये संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.