जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्यावर १५ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण पाटील यांना सभापतीपदासाठी एक वर्षापर्यंत संधी देण्यात आली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ नुकताच संपला असला तरी त्यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे त्यांच्यावर १७ पैकी तब्बल १५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला असून या प्रस्तावाला जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले आहे. दरम्यान, सभापती लक्ष्मण पाटील हे अविश्वासाआधीच राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या अविश्वास नाट्यामागे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सत्तासंघर्ष असल्याचेही दिसून आले आहे. लकी टेलर हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने त्यांचे पंख कापण्यासाठी अविश्वासाची खेळी करण्यात आल्याचे मानले जात आहे.