पाटणा वृत्तसंस्था । ख्यातनाम राजकीय रणनितीकार तथा जेडीयूतून हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार हे नामनिर्देशीत मुख्यमंत्री असल्याचे नमूद करत त्यांच्यावर सूचक टीका केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे. तर, संयुक्त जनता दलाचे माजी नेते राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर सूचक पध्दतीत टीका केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, भाजपा नामनिर्देशित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनिंदन. राज्याला काही वर्षांपर्यंत एका थकलेल्या व राजकीयदृष्ट्या महत्वहीन झालेल्या नेत्याच्या प्रभावहीन सरकारसाठी तयार रहायला हवे. असं प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं आहे.
सातत्याने पक्षविरोधी विधानं केल्याप्रकरणी जनता दल संयुक्त (जेडीयू) चे उपाध्यक्ष राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अनेकदा नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. यातच जेडीयूच्या खालावलेल्या कामगिरीनंतरही मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पुन्हा एका टीकास्त्र सोडल्याचे दिसून येत आहे.