दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात पीडितांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी सात दिवसांच्या उपचारांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे.
या योजनेबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही कॅशलेस ट्रीटमेंट ही एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे अपघात झाल्यानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. या योजनेद्वारे पीडिताच्या उपचारांवर जास्तीत जास्त १.५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. याचबरोबर हिट अँड रन प्रकरणात मृत झालेल्या व्यक्तीसाठी सरकार दोन लाख रुपये देखील देणार आहे.”
दिल्लीतील भारत मंडपम येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. या बैठकीचा उद्देश वाहतूक धोरणांमध्ये सुधारणा करणे आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमधील सहकार्य वाढवणे हा होता. यावेळी गडकरी यांनी असेही सांगितले की, हिट अँड रन अपघातात जीव गमावणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.