शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत- नितेश राणे

मुंबई प्रतिनिधी । सुशांतसिंह राजपूत याच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी शिवसेनेतील नेतेच प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला आहे.

भाजपचे नेते नितेश राणे यांनी एबीपी-माझा या वृत्त वाहिनीशी बोलतांना पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्‍चर्य आहे. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

नितेश राणे पुढे म्हणाले की, रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचं नाव का घ्यावंसं वाटलं, सीबीआयला आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार आहोत. अनिल परब यांनीच ट्विट करत १३ तारखेला पार्टी झाली असं सांगितलं. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असून आव्हान देत आहेत. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

याप्रसंगी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, अडचण आली की मराठी अस्मिता, भूमिपूत्र हेच विषय दिसतात. मुंबई पोलिसांचं खच्चीकरण केलं जात असून त्यांच्यावर दबाव आहे. कोणाचा दबाव आहे हे सीबीआय तपासात स्पष्ट होईल असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे.

Protected Content