वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळील रस्त्यावर दाटीवाटीने कोंबून म्हशीची वाहतूक करणारे दोन ट्रक पोलीसांनी रविवारी १६ जून रोजी पहाटे ५ वाजता कारवाई करत पकडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील बोहार्डी ते हतनूर गावादरम्यानच्या रस्त्यावरून विना परवाना दोन ट्रक मधून म्हशींची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने रविवारी १६ जून रोजी पहाटे ५ वाजता कारवाई करत ट्रक क्रमांक (एमएच १८ बीझेड ६४७७) आणि (एमपी ०९ डीजी ६६४४) हे दोन ट्रक आडविले. त्यात पोलीसांनी चौकशी केली असता यात दोन्ही ट्रकमध्ये एकुण ३८ म्हशी आढळून आल्या. या म्हशींना दाटीवाटीने कोंबून बांधण्यात आले होते. ही वाहतूक विनापरवाना होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहे. तर म्हशींची सुटका करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक लखन सखाराम शिंदे वय ३५ रा. सोंधवा जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश आणि राजूखॉ सलीम खॉ वय ४० रा. खरगोन राज्य मध्यप्रदेश या दोघांवर सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे हे करीत आहे.