नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दयेची याचिका फेटाळल्यानंतरही गुन्हेगारांना १४ दिवसांचा अवधी दिला जातो, असे सरकारी वकिलांनी हायकोर्टात सुनावणीवेळी सांगितले. दोषी मुकेशने क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हायकोर्टात सुनावणीदरम्यान दोषी मुकेशच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले. ‘राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. दया याचिका फेटाळल्यानंतरही फाशीच्या अगोदर दोषी व्यक्तीला १४ दिवस दिले जातात,’ असं वकिलांनी सांगितलं. त्यावर सरकारी वकिलांनीही आक्षेप नोंदवला नाही. दया याचिका फेटाळल्यानंतर नियमांनुसार दोषीला १४ दिवसांचा अवधी दिला जातो, असं सरकारी वकील म्हणाले.
हायकोर्टाने फटकारले
डेथ वॉरंटविरोधात दोषी मुकेशनं दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं वकील राहुल मेहरा यांनी बाजू मांडली. यावेळी हायकोर्टानं दिल्ली सरकार आणि पोलिसांना फटकारले. तुरुंग अधिकाऱ्यांकडून दोषींना पहिली नोटीस बजावण्यास इतका विलंब का झाला, असा प्रश्न कोर्टाने विचारला. या व्यवस्थेचा दोषींकडून कशा प्रकारे दुरुपयोग केला जात आहे हे यातून स्पष्ट होत आहे.