उत्तरकाशीत गिर्यारोहकांच्या समूहातील नऊ जणांचा मृत्यू

उत्तरकाशी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सहस्त्रताल शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांच्या मोठ्या समूहातील नऊ जणांचा खराब हवामानामुळे मृत्यू झाला आहे. ४,४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील काही गिर्यारोहकांचा एक मोठा समूह या शिखरावर चढाई करण्यासाठी गेला होता. त्यांच्याबरोबर एक स्थानिक मार्गदर्शकही होता. दरम्यान, खराब वातावरणामुळे या समुहातील गिर्यारोहकांचा मार्ग भरकटला. दाट धुखे आणि बर्फवर्षावामुळे या गिर्यारोहकांना २ जून रोजी कोखली टॉपच्या बेस कॅम्पजवळ रात्र काढावी लागली.

थंडीमुळे गिर्यारोहकांच्या या समूहातील चार महिलांसह पाच जणांची प्रकृती खालावून मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने जमिनीवरून आणि हवाई मार्गाने बचावकार्याला सुरुवात केली. हवाई दल, एसडीआरएफ आणि खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी बचाव मोहिम हाती घेण्यात आली. दरम्यान, या बचाव पथकांना काही प्रमाणात यश मिळाले असून त्यांनी या गिर्यारोहकांच्या समूहातील ११ जणांची सुटका केली आहे.

एसडीआरएफमधील वरिष्ठ अधिकारी मणिकांत मिश्रा म्हणाले, ४ गिर्यारोहक अद्याप बेपत्ता आहेत. आम्ही या बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेत आहोत. मात्र खराब वातावरणाने पाच गिर्यारोहकांचा बळी घेतला आहे. आशा (७१), सिंधू (४५), सुजाता (५१), चित्रा परिणित (४८) आणि विनायक (५४) अशी मृत्यूमुखी पडलेल्या पाच गिर्यारोहकांची नावं आहेत. या गिर्यारोहकांचा समूहाचा गाईड आणि इतर चार जण अद्याप बेपत्ता आहेत. आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

मणिकांत मिश्रा म्हणाले, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. गिर्यारोहकांना शोधण्यासाठी पाठवलेल्या एसडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पोहोचण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्याचबरोबर बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमालयीन भागातील खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरद्वारे बचाव मोहीम राबवता येत नाहीये. ३५ किलोमीटरच्या या अवघड हिमालयीन ट्रेकवर बचाव पथकांना पोहोचण्यातही अडथळे येत आहेत. त्यामुळे आम्ही हवाई दलाची मदत घेत आहोत. हवाई दलाने बुधवारी सकाळी सुरू केलेली शोध आणि बचाव मोहीम गुरुवारी सकाळीदेखील चालू ठेवण्यात आली आहे. पाच गिर्यारोहकांचे मृतदेह बचाव पथकांना सापडले आहेत. इतर चार जणांचा मृतदेह शोधण्याचं कामही चालू आहे.

Protected Content