सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आपली संघटनात्मक आणि राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देण्याच्या निर्धाराने, काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी नीलिमा केतन किरंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. केवळ नगराध्यक्ष पदच नव्हे, तर काँग्रेसने आठ प्रभागांमध्ये अनुभवी, लोकप्रिय आणि कार्यकर्त्यांच्या मजबूत पाठबळावर विश्वास असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसने भाजप आणि महायुतीसमोर एक मजबूत आणि सज्ज आव्हानाची रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी ज्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत, त्यात हकीम एमत तडवी, कलीम खान हैदर खान, सदीका बी शेख दानिश, सुमैय्या नाज मुदस्सर नजर, मोमीन सुफिया बी शेख शरीफ, शेख इरफान शेख इकबाल, प्रियांका ईश्वर इंगळे, आणि शेहेनाजबी शेख युसुफ यांचा समावेश आहे. फैजपूर शहराला काँग्रेसची केवळ ऐतिहासिक नव्हे, तर वैचारिक कर्मभूमी म्हणूनही ओळखले जाते. याच भूमीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन आयोजित करण्यात आले होते, ज्यामुळे शहरात काँग्रेसची मुळे अतिशय खोलवर रुजलेली आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या नगरपरिषद निवडणुकीच्या इतिहासावर नजर टाकल्यास, फैजपूरकरांनी केवळ तीन टर्मचा अपवाद वगळता, नेहमीच काँग्रेस किंवा त्यांच्या समविचारी नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना नगराध्यक्ष पदी निवडून दिले आहे.

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे आकडेवारी पाहिली असता, महाविकास आघाडीला मिळालेली मतांची लक्षणीय आघाडी, ही फैजपूरची राजकीय दिशा, येथील विचारसरणी आणि जनमत स्पष्टपणे काँग्रेस पक्षाकडे झुकलेले असल्याचे दर्शवते. ‘शिक्षणाची गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या प्रगतीमध्ये काँग्रेसने केलेल्या विकासकामांचा प्रभाव आजही ठळकपणे दिसतो आणि याची जाण फैजपूरच्या सुजाण नागरिकांना निश्चितच आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या या धडाकेबाज आणि दमदार शक्तीप्रदर्शनामुळे शहरातील निवडणुकीचे तापमान कमालीचे वाढले असून, ही लढत भाजप-महायुतीसाठी सोपी न राहता, त्यांना एका कठीण आणि कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.



