जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तरसोद येथील श्री गणपती मंदिर तीर्थक्षेत्र परिसर विकासासाठी सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून शासनाच्या ग्रामविकास विभागाने 1 कोटी 9 लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून ना.गुलाबराव पाटील यांनी वचनपूर्ती केली आहे. तरसोद येथे मंदिर परिसरात भक्त निवास बांधकाम व महिला आणि पुरुष स्वच्छतागृह व स्नानगृहाचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच जळगाव व धरणगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या बांधकामासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत प्रत्येकी 18 लाख असा एकूण 1 कोटी 8 लाखाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. एकूण 2 कोटी 167 लाखाच्या विकास कामांमुळे भाविक भक्त व ग्रामस्थांनी ना. गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले आहे.
6 ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 1 कोटी 8 लक्षच्या कामास मान्यता
शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्यास ग्रामविकास विभागाच्या 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी मिळाली आहे. यात मतदार संघातील जळगांव तालुक्यातील वडनगरी,धामणगाव तर धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु।।, अंजनविहिरे व झुरखेडा या गावांचा समावेश आहे.
असा असेल ग्रा.पं. कार्यालयाचा आराखडा
30 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयाद्वारे तयार केलेल्या प्रचलित आराखड्यानुसार सदर ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यात येणार असून यामध्ये जन सुविधा केंद्र , तलाठी/सरपंच ,ग्रामसेवक कार्यालय, मिटींग हॉल तसेच महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृहाची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात येणार आहे . 18 लक्ष पैकी 15 % निधी ग्रामपंचायत तिला भरावा लागणार आहे.सदर ग्रामपंचायत कार्यालयासाठी कमीत कमी 78 चौरस मीटर म्हणजे 840 चौरस फूट जागेत सदरचे नवीन ग्रामपंचायत कार्यालय ना.गुलाबराव पाटील यांच्या पाठ पुराव्यामुळे होणार असल्याने ग्रामस्थांनी व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलेआहे.
तरसोद मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्याबाबत सरपंच अर्चना पंकज पाटील,उपसरपंच रिता पद्माकर बरहाटे,सदस्य पंकज पाटील,शांताराम राजपूत, महेंद्र सोनवणे,लिलाबाई ताराचंद पाटील,मंगला अरुण भिल ,शिवसेनेचे शाखा प्रमुख रवींद्र महाजन व दिगंबर धनगर यांच्यासह ग्रा. प.चे व वि.का. सोसायटीचे पदाधिकारी तसेच श्री गणपती मंदीर देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. तसेच ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम मंजुरीसाठी अंजनविहिरे, पिंप्री , झुरखेडा, चमगाव ,धामणगाव व वडनगरी येथिल सरपंच व पदाधिकारी यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गळ घातली होती.