Home प्रशासन मोठी बातमी : निलेश राणे यांना शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी !

मोठी बातमी : निलेश राणे यांना शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी !


फैजपूर/सावदा | फैजपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी निलेश उर्फ पिंटू राणे यांना जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालये यावल आणि रावेर तालुक्यांमधील शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनी दिनांक 16 जुलै रोजी फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात असभ्य वर्तन केल्याने खळबळ उडाली होती. याचे अतिशय व्यापक असे पडसाद उमटले होते. फैजपूर व यावल तालुक्यात याच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. याआधी राणे यांनी आदल्या दिवशी म्हणजेच 15 जुलै रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात चुकीच्या प्रकारे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारांच्या विरोधात महसूल कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश जारी करत निलेश मुरलीधर राणे रा. फैजपूर यांना जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालये आणि रावेर व यावल तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दिनांक 19 जुलै ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रवेश करण्यापासून बंदी घातली आहे. या कालावधीत ते कोणत्याही तक्रारी ऑनलाईन या प्रकारात करू शकतात. तसेच कोणत्याही सुनावणीस ते दूरभाष प्रणालीद्वारे उपस्थित राहू शकतात. तर, या कालावधीत ते कोणत्या निवडणुकीला उभे राहणार असतील तर त्यांना एक तासाची मुभा देण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशावर प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांची स्वाक्षरी आहे.

दरम्यान यासंदर्भात आम्ही निलेश उर्फ पिंटू राणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मी लोकप्रतिनिधी असून जनतेच्या कामांसाठी मला नेहमी शासकीय कार्यालयात जावे लागते. मधुकर साखर कारखान्यासाठी मी लढत असून यावल तहसीलदारांच्या निलंबनासाठी मी प्रयत्नशील असल्याने हा प्रकार करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय संविधानातील अधिकाराच्या विरोधात असून माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे निलेश राणे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना सांगितले.


Protected Content

Play sound