माझ्या उपमुख्यमंत्रीपदाच्या बातम्या निराधार : खा. श्रीकांत शिंदे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या खात्यांवर अनेक मोठ्या बैठकी होत आहेत. आशातच श्रीकांत शिंदे यांच्या स्पष्टीकरणामुळे आता सर्व चर्चांना उत्तर मिळाले आहे. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यावर आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडले आहे. सोशल मीडियवर पोस्ट करत त्यांनी लोकसभेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच गोष्टींवर भाष्य केले.

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.

Protected Content