जळगाव प्रतिनिधी । गरोदर महिलेला रुग्णवाहिकेअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. यामुळे नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात प्रशासनाविरुद्ध एकच संताप व्यक्त केला.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील धामणगाव येथील चंद्रभान देवीदास सपकाळे (वय-32) यांच्या गरोदर पत्नी खटाबाई चंद्रभान सपकाळे (वय-25) यांना मध्यरात्री 2 वाजता प्रसुती कळा यायला लागल्या. चंद्रभान सपकाळे यांनी तातडीने 108 शी संपर्क साधुन रूग्णवाहिका बोलाविला. मात्र, रूग्णवाहिका रात्री 2.30 वाजेच्या सुमारास आली. त्यानंतर महिलेला धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी महिलेची प्रकृती तपासणी केल्यानंतर जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्याच रूग्णवाहिकेतून गरोदर महिलेला ममुराबाद येथील नर्सला सोबत घेवून जळगावकडे यायला निघाले. परंतू ही रुग्णवाहिका फार्मसी कॉलेजजवळ बंद पडली. रूग्णवाहिकेच्या चालकाने त्यांच्या मोबाईलवरून दुसऱ्या रूग्णवाहिकेच्या चालकाला फोन लावला. मात्र रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पहाटे 4 वाजेपर्यंत कोणतेही वाहन उपलब्ध न झाल्याने महिलेने बाळाला जन्म दिला. यानंतर एक तासानंतर खासगी वाहनाने महिलेसह बाळाला जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी बाळाला मृत घोषीत केले. दरम्यान बाळाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या 108 रूग्णवाहिका आणि जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात 4 रूग्णवाहिका उपलब्ध असतांना रूग्णावाहिका न पाठविण्यास जबाबदार असणाऱ्याविरुद्ध चंद्रभान पाटील यांनी तक्रार नोंदविली आहे.