मोठी बातमी : व्हाटसॲपमध्ये व्यापक बदल, कम्युनिटीजसह मिळणार ‘या’ सुविधा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या व्हाटसॲपने आज मोठे अपडेट जाहीर केले आहे. यात कम्युनिटीजसह अनेक नवीन सुविधा युजर्सला मिळणार असून या माध्यमातून व्हाटसॲपची उपयुक्तता अजून वाढणार आहे. जाणून घ्या याबाबत सुलभ-सोप्या मराठीतून माहिती !

व्हाटसॲपने केलेली क्रांती कुणी अमान्य करणार नाही. एकाच वेळेस एसएमएस, एमएमएस आदींपासून ते ई-मेल पर्यंतची सुट्टी करणारे हे मॅसेंजर जगभरातील युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. युटीलिटी आणि टाईमपास यांचा अनोखा संगम व्हाटसॲपमध्ये झालेला आहे. २००९ साली सुरू झालेल्या व्हाटसॲपची लोकप्रियता ही खर्‍या अर्थाने फोर-जी नेटवर्कच्या आगमनानंतर सुरू झाली. जगभरात या मॅसेंजरचे दोनशे कोटींपेक्षा जास्त युजर्स असून यातील सुमारे ४० कोटी लोक भारतातील आहेत. आपल्या युजर्सला खिळवून ठेवण्यासाठी व्हाटसॲपमध्ये नवनवीन फिचर्स येत असतात. या अनुषंगाने व्हाटसॲपने आज एकाच वेळी अनेक फिचर्सची सुविधा उपलब्ध करून खर्‍या अर्थाने मोठा धमाका केला आहे. या संदर्भात व्हाटसॲपने जाहीर केलेली पोस्ट आपण या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. यानुसार व्हाटसॲपच्या युजर्सला आता खालील नवीन फिचर्स वापरता येणार आहेत.

कम्युनिटीज : व्हाटसॲपने जाहीर केलेल्या फिचर्समधील ही सुविधा सर्वात लक्षणीय अशीच आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर हा आपल्याला हव्या असणार्‍या विविध ग्रुप्सची एक कम्युनिटी तयार करू शकेल. यानंतर त्या सर्व ग्रुप्समध्ये एकाच वेळीस कोणताही संदेश पाठविण्याची सुविधा त्याला असेल. उदाहरणार्थ, माझ्या मोबाईलमध्ये पत्रकारांशी संबंधीत असलेल्या सर्व ग्रुप्सला मी स्वत: एका कम्युनिटीत परिवर्तीत करेल. यानंतर मी एकाच वेळी या सर्व ग्रुप्समध्ये संदेश पाठवू शकेल. याला देखील ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’चे अभेद्य कवच प्रदान करण्यात आलेले आहे. अर्थात, हे संदेश वहन देखील अतिशय सुरक्षित असेल असे व्हाटसॲपने नमूद केले आहे. या फिचरच्या मदतीने शेअरिंगसाठी लागणारा वेळ कमी होणार असल्याची बाब उघड आहे.

(खालील छायाचित्रात कम्युनिटीजची झलक दर्शविण्यात आली आहे. )

तब्बल २ जीबीपर्यंत फाईल शेअरिंग : व्हाटसॲपवर सध्या व्हिडीओजसह अन्य मोठ्या फाईल्सचे आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात होते. मात्र यातील एकमेव त्रुटीची बाब म्हणजे फक्त १०० मेगाबाईटपर्यंतच्या फाईल्स व्हाटसॲपवरून शेअर होत असतात. आता ही मर्यादा २० पटीने म्हणजे तब्बल दोन जीबीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सध्या टेलीग्रामवर इतकी मोठी फाईल पाठविता येत असते. मात्र आता व्हाटसॲपदेखील हीच सुविधा देणार असल्याचे आता यावरून चित्रपटांसह अन्य मोठ्या फाईल्सची आदान-प्रदान सुलभ सोपी होणार आहे.

ॲडमीन करू शकेल ग्रुपमधील पोस्ट डिलीट : व्हाटसऍप ग्रुपच्या ॲडमीनला आता अमर्याद अधिकार येणार आहेत. यासाठी नवीन फिचर देण्यात येणार असून याच्या मदतीने कोणत्याही ग्रुपमधील आक्षेपार्ह मॅसेज हा त्या ग्रुपचा ॲडमीन डिलीट करू शकणार आहे. परिणामी ग्रुप्स माध्यमातून त्रासदायक मॅसेज पाठविल्यानंतर होणार्‍या मनस्तापातून युजर्सची मुक्तता होणार आहे. अर्थात, यासाठी ॲडमीनला जागल्याच्या भूमिकेत रहावे लागेल.

(खालील छायाचित्रात व्हाटसॲपमधील नवीन फिचर्सची माहिती दिलेली आहे. )

रिॲक्शन्सची सुविधा : व्हाटसऍप ग्रुपमधील एखादा मॅसेज आवडल्यानंतर दुसरे युजर्स यावर रिॲक्शन्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ शकतील. यामुळे ग्रुपमध्ये चॅटची भाराभार स्थिती न होता, एखाद्या फेसबुक पोस्टवरील विविध रिॲक्शन्स प्रमाणेच यावर लाईकसह अन्य मूडसच्या रिॲक्शन्स देता येणार आहेत.

व्हाईस कॉलची मर्यादा वाढणार : व्हाटसॲपने आता आपल्या युजर्ससाठी एकाच वेळेस ३२ जणांचा ग्रुप कॉल करण्याची सुविधा नवीन अपडेटच्या माध्यमातून दिली आहे.

हे सर्व फिचर्स युजर्ससाठी जाहीर करण्यात आले आहेत. अर्थात, जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने याचे अपडेट मिळणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये भारतातील युजर्सला कम्युनिटीजसह सर्व सुविधांचा वापर करता येणार आहे. आणि याच्या माध्यमातून व्हाटसॲपचा वापर हा अधिक सुलभ, चित्तथरारक आणि मनोरंजक असा होईल हे निश्‍चीत.

Protected Content