मुंबई-वृत्तसेवा । भोंदू अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड घडली असून विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. या कारवाईमुळे चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असून, चौकशीदरम्यान पुढील कायदेशीर कारवाई होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात आधीपासूनच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नाशिकमधील पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे तपास यंत्रणांवर दबाव वाढल्याचेही बोलले जात होते.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मिरगाव येथील शिवनिका संस्थान या ट्रस्टशी संबंधित सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून चाकणकर यांना समन्स पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात ट्रस्टशी संबंधित सर्व विद्यमान आणि माजी सदस्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना समन्स ही केवळ चौकशीची प्रक्रिया असल्याचे सांगितले. “समन्स बजावला म्हणजे काही आभाळ कोसळले नाही. हा तपासाचा एक भाग आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मात्र गंभीर आरोप करत चाकणकर या कायद्याने सहआरोपी असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, “या प्रकरणात त्यांचा प्रत्यक्ष हितसंबंध असून त्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा संशय आहे. तसेच त्या संबंधित ट्रस्टशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे असा सवालही उपस्थित केला की, हजारो महिलांचे कथित शोषण होत असताना संबंधित यंत्रणा निष्क्रिय का राहिल्या.
ठोंबरे पाटील यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात ट्रस्टशी संबंधित सर्व व्यक्तींना सहआरोपी करण्याची गरज असून तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर न्यायालयात कारवाई होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना पुढील काही दिवसांत अधिक वेग येण्याची शक्यता आहे.



