Home प्रशासन केंद्र सरकारचा नवा आदेश ; पीएनजी कनेक्शन असलेल्यांना एलपीजी गॅस सोडावा लागणार 

केंद्र सरकारचा नवा आदेश ; पीएनजी कनेक्शन असलेल्यांना एलपीजी गॅस सोडावा लागणार 


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  वृत्तसेवा । देशात वाढत चाललेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती गॅस कनेक्शन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार आता ज्या ग्राहकांकडे पाईपद्वारे मिळणारे पीएनजी गॅस कनेक्शन आहे, त्यांना एलपीजी गॅस कनेक्शन सोडावे लागणार आहे. या निर्णयामुळे देशातील विशेषतः महानगरांमधील लाखो ग्राहकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारकडून अधिकृतपणे गॅस टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी अनेक भागात गॅस पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगचा कालावधी वाढविण्यात आला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा देखील काही प्रमाणात बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती गॅस वितरणाचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

नवीन आदेशानुसार ज्या नागरिकांच्या घरी आधीपासून पाईपद्वारे पीएनजी गॅसचा पुरवठा होत आहे, त्यांना सरकारी तेल कंपन्यांच्या वितरकांकडून एलपीजी सिलेंडरचा पुरवठा मिळणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना आपले एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे लागणार आहे. सरकारच्या मते, एकाच घरात पीएनजी आणि एलपीजी अशा दोन्ही प्रकारचे कनेक्शन असल्याने गॅस पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होते तसेच काही ठिकाणी काळाबाजार आणि दुहेरी वापराच्या तक्रारी वाढत असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, पीएनजी कनेक्शनधारकांची संख्या प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, सूरत यांसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आपले एलपीजी गॅस कनेक्शन बंद करावे लागणार असून याचा थेट परिणाम घरगुती गॅस वापराच्या पद्धतीवर होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर गॅसच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईही सुरू करण्यात आली आहे. भिवंडी येथे शिधावाटप नियंत्रण कार्यालयाच्या भरारी पथकाने छापा टाकून ८४ गॅस सिलेंडर जप्त केल्याची घटना समोर आली आहे. वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.


Protected Content

Play sound