Home आरोग्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू होणार

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू होणार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासा देणारा निर्णय घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे उपचारासाठी लागणारी आर्थिक मदत अधिक जलद गतीने मिळणार असून अर्ज मंजुरीची प्रक्रिया केवळ ८ तासांत पूर्ण होणार आहे.

या प्रणालीची विशेष बाब म्हणजे आता रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज राहणार नाही. रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेत आहे, त्या कक्षाशी संलग्न रुग्णालयामार्फतच थेट अर्ज सादर केला जाणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून रुग्ण व नातेवाईकांचा त्रास कमी होणार आहे.

ही नवी प्रणाली लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून राज्यभर लागू केली जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत गेल्या काही काळापासून रुग्णस्नेही बदल करण्यात येत असून त्याचाच हा एक महत्त्वाचा भाग आहे.

दरम्यान, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४०,७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे, ही बाबही यावेळी समोर आली आहे.

कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे मंजुरी प्रक्रिया वेगवान होऊन अधिकाधिक रुग्णांना तातडीने मदत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.


Protected Content

Play sound