Home Cities जळगाव ग्रामीण सुशासनाचा नवा आदर्श: जामनेर पंचायत समिती जिल्ह्यात पहिली ISO प्रमाणित

ग्रामीण सुशासनाचा नवा आदर्श: जामनेर पंचायत समिती जिल्ह्यात पहिली ISO प्रमाणित


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करनवाल यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ग्रामपंचायत आणि पंचायत समित्यांच्या सक्षमीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO मानांकन मिळवून देण्याचे व्यापक उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या प्रयत्नांची पहिली फलश्रुती म्हणून जामनेर पंचायत समितीने ISO 9001-2015 मानांकन प्राप्त करत, जिल्ह्यातील पहिली ISO प्रमाणित पंचायत समिती होण्याचा मान पटकावला आहे.

हा बहुमान प्राप्त करण्यासाठी जामनेर पंचायत समितीने आपल्या प्रशासनिक कार्यपद्धतीत, सेवा वितरणात, नागरिकाभिमुखतेत, पारदर्शकतेत आणि गुणवत्तापूर्ण कामकाजात उल्लेखनीय सुधारणा केल्या. समितीच्या कार्यप्रणालीतील गुणवत्ता व्यवस्थापन, दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन), जनसेवा प्रक्रियेतील शिस्तबद्धता आणि कर्मचारी प्रशिक्षण या घटकांवर विशेष भर देण्यात आला. या मानांकनाचे प्रमाणपत्र गट विकास अधिकारी श्री. कृष्ण इंगळे यांनी स्वीकारले.

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी संपूर्ण जामनेर पंचायत समितीच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. तसेच, जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनीही यापासून प्रेरणा घेऊन आपल्या कामकाजात सुधारणा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

ISO मानांकन ही केवळ गुणवत्ता मान्यता नसून, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुशासन व कार्यक्षमतेकडे वाटचाल दर्शवणारा एक सकारात्मक टप्पा ठरला आहे. यामुळे ग्रामीण प्रशासनाची कार्यक्षमता आणि जनतेला मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound