जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | होंडा कंपनीने आपल्या सीडी ११० या मॉडेलचे नवीन व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात किफायतशीर दरात अनेक सरस फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन होंडा सीडी ११० ड्रीम डिलक्स ही दुचाकी सादर केली आहे. यात एकापेक्षा एक अनेक सरस फिचर्स आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याचे मूल्य हे अतिशय किफायतशीर असेच आहे. होंडा कंपनीच्या आजवर ग्राहकांना उदंड प्रतिसाद मिळालेला सीडी ११० या दुचाकीची ही अद्ययावत आवृत्ती असून याला चार रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने काळा-लाल, काळा-निळा; काळा-हिरवा आणि काळा-राखाडी असे चार ड्युअल टोनमधील मॉडेल्सचा समावेश आहे. ग्राहकांना यातून हवे ते मॉडेल निवडता येणार आहे.
फिचर्सचा विचार केला असता, यात आधीप्रमाणेत १०९.५१ सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर एयर कुल्ड या प्रकारातील इंजिन प्रदान करण्यात आले आहे. हे इंजिन उत्सर्जनाच्या ओबीडी२ या निकषानुसार विकसित करण्यात आले आहे. यामध्ये चार गिअर्सची सुुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. या दुचाकीमध्ये ट्युबलेस टायर्सची सुविधा दिलेली आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, या बाईकमध्ये हॅलोजन लँप; फाईव्ह स्पोक अलॉय व्हिल्स; कॉंबी ब्रेक सिस्टीमने युक्त असणारी डिस्क ब्रेक प्रणाली; लगेज रॅक, आदींचा समावेश आहे. या मॉडेलसाठी कंपनीने १० वर्षांची वॉरंटी प्रदान केली असून यात नियमीत ३ वर्षे आणि एक्सटेंडेड सात वर्षे असा समावेश आहे. यात ऑटो-स्टार्ट आणि किक-स्टार्ट या दोन्ही सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.
नवीन होंडा सीडी ११० ड्रीम डिलक्स या मॉडेलचे मूल्य ७३,४०० रूपये (एक्स-शोरूम) इतके असून देशभरातील कंपनीच्या डिलर्सच्या माध्यमातून ग्राहक याला खरेदी करू शकणार आहे. भारतीय बाजारपेठेत ११० सीसी क्षमतेच्या मोटारसायकल्स या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या असून आता नवीन होंडा सीडी ११० ड्रीम डिलक्स मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना एक नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे.