नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनले, याबाबत मी आश्वस्त आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवरुन दिली आहे. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी हे भाष्य केले आहे.
फडणवीस म्हणाले, विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतर अकराव्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. ‘राज्यात ३२५ तालुक्यात शेतीचे नुकसान झालेले आहे. अनेक गावांत शेतीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे. यासंदर्भातल्या केंद्र सरकारच्या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. त्यामुळे मी अमित शहांची भेट घेतली,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होईल हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळला. तसेच महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेकजण बोलत आहेत मी त्याबाबत काहीही बोलणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्तेची समीकरणं रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली.