Home Cities भुसावळ भुसावळ नगरपरिषदेला नवी दिशा ; गायत्री भंगाळे यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार

भुसावळ नगरपरिषदेला नवी दिशा ; गायत्री भंगाळे यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार

0
592

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेला आज नवे नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्री चेतन भंगाळे यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी नगरपरिषद कार्यालयात उत्साही वातावरण पाहायला मिळाले असून, शहराच्या विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

पदभार स्वीकारताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासोबत माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक उल्हास पगारे यांच्यासह विद्यमान व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले आणि अधिकृत प्रक्रिया पार पाडली.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी भुसावळ शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज आणि मूलभूत नागरी सुविधा या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी भुसावळच्या विकासाबाबत आक्रमक भूमिका मांडली. शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी उद्यापासूनच ‘ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना’ खेळणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कमी वेळेत जास्तीत जास्त कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगरपरिषदेच्या विविध विभागांची कार्यपद्धती अधिकाऱ्यांकडून समजून घेतली. शहराच्या प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमान निर्णयप्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. यावेळी त्यांचे सासरे नारायण भंगाळे आणि पती चेतन भंगाळे यांचीही उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेझ अहमद, कार्यालय अधीक्षक वैभव पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

एकूणच, गायत्री भंगाळे यांच्या नगराध्यक्ष पदग्रहणामुळे भुसावळ नगरपरिषदेत नव्या जोमाने कामकाजाला सुरुवात होणार असून, रखडलेल्या विकास कामांना गती मिळण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound