जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज (दि.२४ जुलै) पदभार स्वीकारला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.
श्री. आयुष प्रसाद यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. भारतीय प्रशासकीय सेवा २०१५ बॅचचे ते अधिकारी आहेत. धाराशिव (उस्मानाबाद) व खेड (पुणे) येथे परीक्षाविधीन म्हणून प्रांताधिकारी पदावर कामकाज तसेच अकोला येथे जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी या पदावर ते प्रथमच जळगाव येथे कामकाज सांभाळणार आहेत.
जिल्हधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.प्रसाद यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींचा आढावा घेतला. जळगाव जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू , पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते .
यावेळी श्री.प्रसाद यांनी जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, माहिती -तंत्रज्ञानाच्या सोबतीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ई-गव्हर्नस द्वारे कारभार करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार आहे. जिल्हा प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान पद्धतीने चालवण्यात येईल. भूसंपादनाअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहील. एक गाव-एक गणेशोत्सव ची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार येईल. जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नव मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी.असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी यावेळी केले.