मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील वरळी कोळीवाड्यात घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजारची महिला आणि तिच्या मुलावर कोयत्या वार केल्याची घटना घडली. या घटनेत संबंधित महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नविता वैद्य आणि त्यांचा मुलगा रोहन वैद्य असे हल्ल्यात जखमी झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. तर, अशोक पाटील (वय, ६९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, नविता आणि रोहन यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीला त्यांच्या घराजवळ कचरा टाकण्यास विरोध केला. मात्र, यामुळे आरोपीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने घरातून कोयता आणला. त्यावेळी रोहनने आरोपीला कोयता घरात ठेवण्यास सांगितले. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर वार केले. त्यावेळी नवीता यांनी मध्यस्ती केली असता आरोपीने त्यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. रोहन आणि त्याचे वडील जयवंत यांनी आरोपीला पकडून घरात बंदिस्त केले. या घटनेत महिलेच्या मानेला आणि हाताला जखम झाली असून मुलाच्या हाताला जखम झाली आहे, अशी माहिती दादर पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
या दोघांनाही मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पाटील यांना अटक करण्यात आली आहे. आई-मुलावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८ (१) (गंभीर दुखापत करणे) आणि ११५ (स्वेच्छेने इजा पोहोचविणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.