मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एनबीईएमएसचे अधिकृत संकेतस्थळ natboard.edu.in वर जाऊन मुलांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. नीट पीजी २०२४ परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे वैयक्तिक गुणपत्रिका ३० ऑगस्ट २०२४ रोजी nbe.edu.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नीट पीजी परीक्षा ११ ऑगस्ट २०२४ रोजी देशातील १८५ शहरांमध्ये दोन टप्प्यात घेण्यात आली. या परीक्षेत २ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि पीजी डिप्लोमा प्रोग्रामसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा एकापेक्षा जास्त टप्प्यात घेण्यात आल्याने निकाल सामान्यीकरण प्रक्रियेच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. नीट पीजी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना २६,१६८ डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी), १३,६४९ मास्टर ऑफ सर्जरी, ९९२ पीजी डिप्लोमा आणि १३३८ डीएनबी सीईटि जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
एनबीईएमएसने सांगितले की प्रश्नांची उत्तरे विषय तज्ञांकडून पूर्णपणे तपासली गेली आहेत आणि कोणताही प्रश्न तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आढळला नाही. अखिल भारतीय कोट्यातील ५० टक्के कोट्यातील जागांसाठी कट ऑफ स्वतंत्रपणे घोषित केला जाणार आहे. तर, राज्य कोट्यातील जागांसाठी अंतिम गुणवत्ता यादी/श्रेणीनिहाय यादी राज्ये/केंद्रशासित प्रदेश त्यांच्या गुणवत्ता/पात्रता निकष, लागू मार्गदर्शक तत्त्वे आणि आरक्षण धोरणानुसार तयार करण्यात येणार आहे. निकालात काही अडचण आल्यास उमेदवारांना ०११-४५५९३००० वर संपर्क साधून त्यांच्या अडचणी दूर करता येणार आहे.