
सावदा, ता. रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महावितरण विभागाने रावेर तालुक्यातील नागरिकांच्या घरांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली असून, यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तालुक्याच्या वतीने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली गेली आहे. सावदा येथील महावितरण कार्यालयात तालुकाध्यक्ष अक्षय राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करून, ही मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महावितरण विभागाने स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही मीटर लावताना नागरिकांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, तसेच याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता थेट घरी जाऊन मीटर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या स्मार्ट मीटरद्वारे येणारे वीज बिल हे अतिशय जास्त असून, मागील नियमित बिलाच्या तुलनेत तीन ते चारपट अधिक आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणी महावितरण विभागाकडे तक्रारी करूनही कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, तसेच ज्या घरांमध्ये हे मीटर बसवले गेले आहेत, त्या सर्व मीटरची सखोल चौकशी करण्यात यावी. चुकीची व जादा आलेली बिलं रद्द किंवा कमी करण्यात यावीत आणि नागरिकांवर अनावश्यक आर्थिक बोजा लादू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना दुर्गेश कुंड, चेतन महाजन, मोंटू पचेरवालं, तेजस बावस्कर, मयूर कवडकर, निखिल सोनवणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जर महावितरण विभागाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. हा मुद्दा आता केवळ तांत्रिक न राहता सामाजिक असंतोषाचे रूप घेत आहे, त्यामुळे प्रशासनाने वेळीच योग्य ती पावले उचलावीत, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.



